Showing posts with label Marathi. Show all posts
Showing posts with label Marathi. Show all posts

Saturday, 23 April 2016

क्रोध पु. ल. देशपांडे

माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं हिमालयात न जाता कपड्याच्या दुकानात नोकरी करावी.- पु. ल. देशपांडे

कापडदुकानातले नोकरलोक हे गेल्या जन्मीचे योगी असतात अशी माझी ठाम श्रद्धा आहे.

बनारसी शालू आणि राजापुरी पंचा एकाच निर्विकार मनानं दाखवतात. कसलाही आग्रह नाही. लुगड्यांच्या शेकडो घड्या मोडतात पण चेहर्‍यावरची घडी मोडू देत नाहीत.
बायका काय वाटेल ते बोलतात.

"शी ! कसले हो हे भडक रंग !"

लुगड्याच्या दुकानातील माणूस संसारात असून नसल्यासारखा चेहरा करून असतो. निष्काम, निरहंकारी चेहरा !
समोरची बाई म्हणत असते,

"कसला हा भरजरी पोत !"

हा शांत.
गिऱ्हाईक नऊवारी काकू असोत, नाहीतर पाचवारी शकू असो, ह्याच्या चेहऱ्यावर शुकासारखे पूर्ण वैराग्य असते.

समोर शेपन्नास सांड्याचा ढिग पडलेला असतो, पण एखाद्या चित्रकला प्रदर्शनातला मेणाचा माणूस बोलावा, तसा अठरा रुपये, तेवीस बारा, बेचाळीस अश्या किमती हा गृहस्थ, "अथोक्षजाय नम: । अच्युताय नम: । उपेंद्राय नम: । नरसिंहाय नम: । ह्या चालीवर सांगत असतो.

सगळा ढिग पाहुन झाला तरी प्रश्न येतोच,

"ह्यातलं लेमन कलर नाही का हो एखादं?"

एक वेळ तेराला तिनानं पूर्ण भाग जाईल पण लुगड्याची खरेदी आटोपली तरी एखाद्या प्रश्नाची बाकी उरतेच. आपली स्वतःची बायको असूनसुद्धा तिच्या चेंगटपणाची चीड येते. पण कापडदुकानातले ते योगीराज शांतपणं म्हणतात,

"नारायण, इचलकरंजी लेमन घे"

खरेच, माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं  हिमालयात न जाता कपड्याच्या दुकानात नोकरी करावी.
- पु. ल. देशपांडे

Saturday, 2 January 2016

साड्यांचे रंग...- पु ल देशपांडे

साड्यांचे रंग...
----------------

"ही लिंबू-पारवा कॉम्बिनेशनची साडी कशी वाटतिये?" बायकोनी विचारलं...

"लिंबू... आणि पारवा...? हे रंग आहेत...?" माझा प्रश्न...

"बरं, ही जाऊ दे... ती श्रीखंडी कशी आहे?"... बायकोचा प्रतिप्रश्न...

"श्रीखंडी?... नको... चिकट असेल..." मी उगाच विनोद मारायचा प्रयत्न केला... पण त्यावर बायको आणि तिला उत्साहानं साड्या दाखवणारा सेल्समन दोघांच्या चेहऱ्यावरची सुरकुतीही हालली नाही...

"बरं, ते ही जाऊ दे.... चिंतामणी किंवा गुलबक्षी रंगात काही बघू का यंदा" बायकोनी विचारलं...

आता मला माझ्या अज्ञानाची प्रकर्षानं जाणीव व्हायला लागली...

जगात "ता ना पि हि नि पा जा" हे एवढेच सातच रंग असतात ही माझी पक्की समजूत होती आणि आहे... त्यातल्याही, तांबड्या आणि नारंगीत किंवा निळ्या आणि जांभळ्यात मला पटकन फरक समजत नाही... या शिवाय पारवा हे रंगाचं नसून कबुतरासारख्या दिसणाऱ्या पक्ष्याचं नाव आहे अशी माझी अनेक वर्षं समजूत आहे...
---------------------------------

---------------------------------

हे सात रंग आणि सरधोपट पांढरा किंवा काळा हे रंग सोडले रंगांच्या इतर छटा एकतर मला ओळखता येत नाहीत किंवा काहीतरी वेगळं आहेच असं वाटलं तर त्यांची नावं मला समजत नाहीत...

माझा अजून एक प्रॉब्लेम म्हणजे, मला हिरवा रंग हिरवाच दिसतो, त्यातल्या कशाला पोपटी म्हणायचं, कशाला सी ग्रीन म्हणायचं आणि कशाला बॉटल ग्रीन हे कळत नाही... तेच निळ्या रंगाचं... निळा म्हणजे निळा... त्यात स्काय ब्लू कोणता आणि मोरपंखी कोणता याचंही मला आकलन होत नाही...

या शिवाय, "डाळिंबी" हा रंग नसून ते "मोसंबी" सारखं देशी दारूचं नाव असावं, "तपकिरी" हे तपकीरचं अन "शेवाळी" हे शेवाळ्याचं अनेक वचन असावं आणि मोतिया हे एखाद्या नबाबाघरच्या पांढऱ्या कुतियेचं नाव असावं अशीही माझी अनेक वर्षं समजूत होती...

पण बायको बरोबर साड्यांच्या दुकानात गेलं की या साऱ्या साऱ्या समजुतींना सुरुंग लागतो. अन या सुरुंगाच्या स्फोटातून लाल, तांबड्या, नारंगी, चिंतामणी, पिवळ्या आणि लिंबू रंगांच्या ज्वाला उसळायला लागून त्यातून राखाडी, पारवा, तपकिरी, किरमिजी रंगांच्या धुराचे लोट उसळायला लागतात...

असो. तर मी असा माझ्या अज्ञानाच्या गर्तेत गटांगळ्या घेत असतानाच बायकोचा पुढचा प्रश्न आला....

"ही केतकी रंगाची साडी कशी आहे? बघ ना... आमसुली काठ आहेत..."

"आमसुली?" माझा शेवटचा प्रश्न असतो...

त्याकडे दुर्लक्ष करून बायको ती साडी अंगावर लपेटून आरशात स्वतःला न्याहाळायला लागते.

अन आपल्याला आवडलेली साडी अंगावर लपेटून आरशात स्वतःकडेच बघत असताना, तिच्या चेहऱ्यावर जो रंग उजळलेला दिसतो त्या रंगाचं नाव काय असावं याचा मी विचार करत बसतो....

- पु ल देशपांडे

Sunday, 22 November 2015

आन्टनी लैरीस

आन्टनी लैरीस त्याचं नाव. त्याच्या फ्रेंच नावाचा उच्चार करणंही महाकठीण. पण परवाच्या पॅरीस हल्ल्यात अतिरेक्याच्या गोळयांना त्याची बायको - हेलन बळी पडली आणि त्यानं आपल्या बायकोला जीवे मारणा-या अतिरेक्याला उद्देशून फेसबुकवर ही पोस्ट लिहिली, पेटत्या उरानं हे शब्द उच्चारणं तितकंच कठीण आहे.
लैरीस लिहतो –

तुला कळलंय का,
शुक्रवारी रात्री तू संपवलं आहेस,
एक आगळं वेगळं आयुष्य ..
ती माझ्या प्रेमाची जितीजागती मूर्ती होती
माझ्या लहानग्याची मायाळू ‘ममा’ होती…
पण तरीही,
माझ्या मनात तुझ्यासाठी
लवलेशही नाही द्वेषाचा ..!

मला नाही माहीत कोण आहेस तू ?
आणि खरं सांगू,
मला ते जाणून ही घ्यायचं नाही ऽ
आत्म्याचं थडगं झालंय ज्यांच्या
त्यांना असते का काही नाव गाव ?

वेडया,
तू जेव्हा बेधुंद चालवित होतास ,
तुझ्या निर्दयी गोळया
माझ्या प्रियेच्या देहावर
तेव्हा,
तुझ्या प्रत्येक गोळीसरशी
जखमी होत होता तुझा खुदा
रक्ताळत होते त्याचे ह्रदय ,
ज्याने स्वतःच्या प्रतिमेबरहुकूम
बनविले होते तुला …!!!
---------------------------------

---------------------------------

द्वेष आणि सूडाची भेट
तरीही,
मी देणार नाही तुला..!
अजिबात नाही..!!
मला आहे ठावे,
तुला हीच भेट हवी आहे.
पण तुझ्या आंधळया द्वेषाला
पांगळया रागाने प्रत्युत्तर देण्याचा
अडाणीपणा मी करणार नाही,
मी नाही जाणार बळी
तिरस्काराच्या या वेडगळ वणव्यात ..!

तुला घाबरावयाचे आहे मला,
तुला वाटते,
मी पाहवे संशयाने
माझ्या प्रत्येक देशबांधवाकडे
आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी
मी ओलिस ठेवावे माझे स्वातंत्र्य ..
सॉरी,
असे काहीच नाही होणार,
हरला आहेस तू …!

अरे,
रात्रंदिवस मी वाट पाहत होती तिची
आणि
अखेरीस आज सकाळी मी पाह्यलं तिला.
तुला सांगू,
बारा वर्षांपूर्वी मी तिला पहिल्यांदा पाहयलं
आणि वेडयासारखा तिच्या प्रेमात पडलो,
त्या क्षणाची आठवण झाली…
तुझ्या गोळयांनी देहाची चाळण झालेली असतानाही
आजही ती तेवढीच सुंदर दिसत होती रे…

माझं चिमुकलं जग उध्वस्त झालंय
मानायचाच असेल तर,
हाच तुझा थोडासा विजय..!
पण माझी ही वेदना फार काळ टिकणार नाही
कारण
मला पक्के ठावे आहे,
ती सदैव माझ्यासोबतच असणार आहे
आणि
आम्ही पुन्हा विहरत राहू
आमच्या अनोख्या प्रेमाच्या नंदनवनात,
जिथे तुला पाऊल टाकायलाही बंदी आहे.

आता आम्ही दोघेच आहोत
मी आणि माझा लहानगा मेल्वील
अवघ्या सतरा महिन्यांचा आहे तो..!
पण लक्षात ठेव,
जगातल्या कोणत्याही सैन्याहून
बलशाली आहोत आम्ही बापलेक..!
तुझ्याकडे लक्ष दयायला वेळच नाही माझ्याकडे,
दुपारच्या झोपेतून आता जागा होईल माझा पोर
मला भरवायचे आहे त्याला
मग
आम्ही बापलेक खेळायला जाऊ…
आणि हो,
हा माझा चिमुकला मेल्वील
असाच मोकळा ढाकळा राहिल
पाखरासारखा
आनंदी असेल
गोजि-या फुलपाखरासारखा
आणि
तुझ्या काळजावर
उमटत राहिल भितीचा थरकाप
कारण
त्याच्याही मनात तुझ्यासाठी
द्वेषाचा लवलेशही नसेल.

( भावानुवाद – डॉ प्रदीप आवटे )

Saturday, 21 November 2015

रतन टाटा यांनी ट्विटरवर

नुकताच रतन टाटा यांनी ट्विटरवर पाठवलेला एक संदेश वॉट्स अपवर आला.
मुळ संदेश इंग्रजीमधे असून त्याचे मराठी रुपांतर खाली देत आहे.
जर्मनी हा औद्योगीकदृष्ट्या अत्यंत प्रगत देश समजला जातो. आर्थिक दृष्टीने तो एक संपन्न देश आहे. त्यामूळे या देशातील जनता ऐश्वर्यसंपन्न जीवन जगत असेल असे आपल्याला वाटत असेल.
मी नुकताच हॅम्बर्गला गेलो होतो तेव्हाचा हा अनुभव आहे. आमच्या स्थानीक प्रतिनिधीने आम्हाला जेवायला म्हणून एका चांगल्या हॉटेलमधे नेले. तेव्हा माझ्या लक्षात आले की त्या हॉटेलमधील बरीचशी टेबले रिकामीच आहेत.
तेथे एक तरूण जोडपे जेवण करत होते. त्यांच्या पुढ्यात फक्त दोन प्लेट्स व दोन बिअरचे कॅन होते. मला वाटले की इतके साधे जेवण रोमँटिक कसे असू शकेल व असे साधे जेवण दिल्याबद्दल ती मुलगी त्याला सोडून तर जाणार नाही ना?
पुढील टेबलावर काही वृद्ध महिला जेवण करत होत्या. वेटर प्रत्येकीच्या डिशमधे वाढत होता व त्या महिला पण अन्नाचा कण अन कण संपवत होत्या. प्लेटमधे काहीही शिल्लक ठेवत नव्हत्या.
आम्हाला भूक लागली होती म्हणून आमच्या स्थानीक प्रतिनिधीने थोड्या जास्त डिशेस ऑर्डर केल्या. जेवण संपवून आम्ही जेव्हा निघालो तेव्हा आम्ही ऑर्डर केलेल्या अन्नापैकी बरेचसे अन्न तसेच उरले होते.
आम्ही जेव्हा निघालो तेव्हा कांही वृद्ध महिला आमच्याशी इंग्लीशमधे बोलू लागल्या. आम्ही बरेचसे अन्न टाकून निघालो होतो हे त्यांना आवडले नव्हते.
‘हे पहा! आम्ही हॉटेलचे पुर्ण बिल दिले आहे. त्यामूळे आम्ही किती अन्न मागे ठेवले याचे तुम्हाला काही देणे घेणे नाही!’ माझ्या सहकार्या्ने सांगीतले.
त्यातील एक महिला फारच चिडली.
तिने लगेच तिच्या पर्समधून सेल फोन काढला व कोणालातरी फोन केला. काही वेळातच सोशल सिक्युरिटीचा युनिफॉर्म घातलेला एक माणूस तेथे आला. आम्ही अन्न तसेच टाकून जात आहोत हे कळल्यावर त्याने आम्हाला तेथल्या तेथे 50 युरो ( अंदाजे 3800 रुपये) दंड केला व म्हणाला
'जेवढे अन्न तुम्ही खाऊ शकत असाल तेवढ्याच अन्नाची ऑर्डर देत चला. पैसे जरी तुमचे असले तरी हे अन्न बनवायला जी साधन सामग्री लागते ते आमच्या सोसायटीची म्हणजे समाजाची आहे. जगात अनेक लोक असे आहेत कि त्यांना पोटभर अन्न मिळत नाही. तेथे साधनांची कमतरता आहे. साधन सामग्री वाया घालवायचा तुम्हाला काहिही अधीकार नाही.’
एका श्रिमंत देशामधील लोकांची मानसिकता बघून आम्हाला आमच्या मानसिकतेची लाज वाटली. आपण अशा देशामधून आलेलो आहोत की जेथे साधनांची कमतरता आहे.
असे असताना सुद्धा आपण पुष्कळ अन्न मागवतो व वाया घालवतो.
अमेरिकेमधे सुद्धा मला हाच अनुभव आला. तेथील अमेरिकन, थाई, चायनीज, मेक्सिकन हॉटेल्समधे अन्न टाकणे किंवा अन्नाची नासाडी करणे निषीद्ध समजले जाते. काही अन्न शिल्लक राहिल्यास थर्मोकेलच्या बॉक्सेस देण्यात येतात. त्यामधे उरलेले अन्न पॅक करून घरी घेऊन जायचे असा रिवाज आहे. बुफेमधे सुद्धा लोक जेवढे पचेल तेवढेच अन्न प्लेटमधे घेतात.
आपल्याकडे मात्र उलटी परिस्थिती आहे. लग्न, मुंज, पार्टी, जेवणावळी, हॉटेल्स यामधे कितीतरी अन्न रोज वाया जात असते. बुफेमधे सुद्धा लोक प्लेटी भरभरून घेत असतात व त्यातले बरेच पदार्थ फेकून देत असतात.
आपण सुद्धा आता अन्न कसे वाया जाणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
तुम्हाला काय वाटते?

Wednesday, 18 November 2015

फसवाफसवी

बँकिंग व्यवसाय आधुनिक झाला आणि त्याचबरोबर त्यातील फसवाफसवीचे प्रमाण वाढू लागले. बँक खाते क्रमांक पळवण्यापासून पिन, पासवर्ड चोरण्यापर्यंत तसेच ग्राहकाला फसवून बँक खात्याची माहिती घेण्यापासून ते बँकेची खोटी वेबसाइटच तयार करेपर्यंत या चोरांची मजल गेली आहे.
या फसव्या जाळ्यापासून कसे दूर राहावे, याची ही हेल्पलाइन.


1.फिशिंग -

फिशिंग दोनप्रकारे करण्यात येते.

(अ) पहिल्या प्रकारात एखाद्या अज्ञात मेल आयडीवरून तुम्हाला लॉटरीचे बक्षीस लागले आहे, अशा मजकुराचा मेल येतो.
बक्ष‌सिाची रक्कम घेण्यासाठी बँक खाते, एटीएम प‌निकार्ड अशी महत्त्वपूर्ण माहिती मागण्यात येते. नायजेरियन व्यक्ती या प्रकारात मोठ्या प्रमाणात गुंतलेल्या असल्याने या प्रकाराला 'नायजेरियन फ्रॉड' असेही म्हटले जाते.


(ब) दुसऱ्या प्रकारात बँकेची खोटी वेबसाइट तयार करून तुम्हाला फसविण्यात येते.
अशा खोट्या वेबसाइटच्या लिंकमध्ये https च्या ऐवजी http असे असते.
पण केवळ s नसलेल्या या वेबसाइटकडे घाई-घाईत क्लि‌क करून माहिती दिली जाते आणि पैसे गमावण्याची वेळ येते.

---------------------------------

---------------------------------

2.वॉशिंग -

व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलने (व्हीओआयपी) ही फसवणूक केली जाते. यात लक्ष्य असलेल्या व्यक्तीला फोन येतो. यात रेकॉर्ड केलेल्या मेसेजसारखा भासणाऱ्या आवाजात तुमच्या अकाऊंटमध्ये काही गैरप्रकार सुरू असल्याचे सांगण्यात येते. तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक करण्याची विनंती करण्यात येते, त्यासाठी एटीएम पिन मागण्यात येतो किंवा तुमच्या कार्डविषयी असलेली अपूर्ण माहिती घेऊन त्या माध्यमातून पैसे काढण्यात येतात.


3.मोबाइल फ्रॉड -

बँकेचे अॅप मोबाइलवर डाऊनलोड करून त्याआधारे बँकिंग करण्याची पद्धत रूढ होत आहे. परंतु, कंपनीचे बनावट अॅप तयार करून त्याआधारे माहिती मिळवण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत.
बँकेचे बनावट अॅप सॉफ्टवेअर डेव्हलपर तयार करतात, त्या माध्यमातून बँकेविषयी तसेच तुमची महत्त्वपूर्ण माहिती मिळवून पैसे काढून घेण्यात येतात.
विशेष म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचेही बनावट अॅप तयार करण्यात आले आहे.


4.मालवेअर -

अशाप्रकारचे फ्रॉड हे कधीही एकट्या-दुकट्या व्यक्तीसोबत होत नाहीत. ग्राहकांच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डाची माहिती साठवून ठेवणाऱ्या रिटेल दुकानांमध्ये असे प्रकार घडतात.
या दुकानांमध्ये कार्डांविषयी माहिती साठवलेल्या सिस्टीममध्ये सॉफ्टवेअरच्या साहाय्याने घुसखोरी करण्यात येते.
हे सॉफ्टवेअर साठवलेली मा‌हिती मिळवते. या माहितीचा वापर ई-ट्रान्झॅक्शन करण्यासाठी किंवा बनावट कार्ड तयार करून खरेदी करण्यात येते.


5.बटणांना गोंद लावणे -

एटीएम मशीनच्या बटणांना खळ, गम किंवा सोल्युशन लावून ती बटणे काम करणार नाहीत याची काळजी घेतली जाते.
एखादी व्यक्ती पैसे काढण्यासाठी आल्यानंतर त्याचे एटीएम कार्ड म‌श‌निमध्ये टाकल्यानंतर बटण दाबताना ती दाबली जात नाहीत. अशावेळी भामटे तुमच्याजवळ येऊन तुम्ही कोणती बटणे दाबताय हे पाहतात.
तुम्हाला मदत करण्याचा किंवा तुमची समस्या ऐकण्याचा बहाणा करत पिन नंबर जाणून घेतला जातो.
तसेच, तुमचे कार्ड अडकून असल्यास तुम्ही गेल्यानंतर पिन नंबर वापरून पैसे काढून घेतले जातात.


6.स्कीमर -

एटीएम मशिन किंवा कार्डद्वारे पैसे अदा करण्याच्या ठिकाणी मशिनना स्कीमर लावण्यात येतात.
हे स्कीमर जिथे कार्ड स्वाइप करण्यात येते, त्याच ठिकाणी अशाप्रकारे लावण्यात येते, की तो एटीएम मशिनचाच एक भाग असल्यासारखे दिसते.
जेव्हा तुम्ही मशिनमध्ये कार्ड टाकता किंवा स्वाइप करता त्यावेळी हा स्कीमर तुमच्या कार्डमधील माहिती मिळवते.


7.मॅन-इन-दी-मिडल -

सार्वजनिक ठिकाणी वायफाय क्षेत्रात दुसऱ्याच्या मोबाइलमध्ये घुसखोरी करून माहिती मिळवण्याचा प्रकार म्हणजे मॅन-इन-दी-मिडल. यात हॅकर विविध सॉफ्टवेअरचा वापर करत तुमच्या मोबाइलचा डेटा पाहतो. मोबाइल बँकिंग किंवा इतर काही माहिती असल्यास ती काढून घेतली जाते.


8.पिन कोड कव्हर करा -

पॉइंट ऑफ सेल किंवा दुकानात पैसे देण्याच्या काऊंटरवर कार्ड वापरून पेमेंट करण्याची वेळ आल्यास कार्डाचा पिन टाइप करताना काळजी घ्या.
विक्रेत्याला कधीही पिन देऊ नका. त्याचप्रमाणे तुमच्या कार्डावर कुठेही पिन लिहून ठेवू नका किंवा कार्ड ठेवत असलेल्या कव्हरमध्ये पिन लिहून ठेऊ नका.


9.मोबाइल क्रमांक नोंदवा -

मोठ्या व्यवहारांची माहिती एसएमएसने संबंधित ग्राहकाला निःशुल्क देण्याचे बंधन सर्व बँकांवर आहे.
तुम्ही तुमच्या खात्यात करत असलेल्या कोणत्याही व्यवहारांचा अॅलर्ट बँकेकडून मागा. त्यासाठी तुमचा मोबाइल क्रमांक तुमच्या बँकेकडे नोंदवा.


10.नियमित खाते तपासा -

खात्यात एखादा गैरव्यवहार झाल्यास त्याची माहिती बऱ्याच दिवसांनंतर बँकेला ग्राहकाकडून दिली जाते. याचे कारण खात्याचे स्टेटमेंट पाहिल्यावरच त्यांच्या ही बाब लक्षात येते. यासाठी ई-बँकिंगसारख्या सुविधा उपलब्ध असल्याने तुमचे बँक खाते नियमितपणे तपासा.


11.बँक तपशील गुप्त ठेवा -

माहिती दिल्याशिवाय तुम्हाला बक्षीस मिळणार नाही, असे कुणी सांगितले, तरीही त्या व्यक्तीला तुमच्या बँक खात्याचा तपशील कधीही देऊ नका. तुमच्या ईमेलवर एखादा मोबाइल नंबर आल्यास त्यावर कधीही कॉल करू नका.


12.एटीएमजवळ अनोळखी नको -

बऱ्याच एटीएम केंद्रांत बहिर्गोल आरसा असतो. त्याचा वापर करून तुम्ही एटीएमच्या साह्याने व्यवहार करताना कोणी पहात नाही ना याची खात्री करा. 


13.ईमेलपासून सावध राहा -

तुमच्या बँक खात्याची माहिती अद्ययावत करा, असे सांगणारे ई-मेल तुम्हाला आले असतील, तर अशी कोणतीही माहिती त्यावर देऊ नका. असा ई-मेल हा फिशिंग मेल असू शकतो. याचा परिणाम ओळख चोरीत (आयडेण्टिटी थेफ्ट) होऊ शकतो.


14.लिंकवर क्लिक करू नका -

तुमच्या ईमेलवर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
अशी लिंक बँकेकडून आलेली असली तरीही लगेच क्लिक न करता त्याचा यूआरएल लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.
मग हा यूआरएल नव्याने अॅड्रेस बारमध्ये टाइप करा आणि मगच पुढील व्यवहार करा.

Friday, 30 October 2015

मन - बहिणाबाई चौधरी

मन वाभरं वाभरं
देहा हातून फरार
किती बांधू दावणीला
स्थिर नाही घडीभर

देह श्रोत्यात बसला
मन आत बडबडे
ऐकू कुणाचे कळेना
दोघे घालती साकडे

मना हरणाचे पाय
देह हातावर घडी
आज्ञा अन अवज्ञेची
आत चाले रेटारेटी

देह समजूतदार
बंद ठेवी सारी दारं
मन मांजर चोरटी
मनातल्या लोण्यावर

देह शिक्षित शहाणा
मन यड खुळं बेणं
देह हसे दुसऱ्याला
मन हसे स्वतःवर
---------------------------------

---------------------------------

देह चुलीपाशी रत
मन फिरे रानोमाळ
देही हिशेब नेटका
मनी कवितेची ओळ

देह टापटीप घडी
मन द्रौपदीचं वस्त्र
देहा लाज अतोनात
मन दत्त दिगंबर

देह घर आवरत
मन आवरतं विश्व
देह कार्यशील मग्न
मन आठवांत रत

देह जागच्या जागी
मन दूर दूर झरे
देह दिनचर्या घडी
मन वेल्हाळ पसरे

देह पाही याची डोळा
मना अलौकिक दृष्टी
देह पाही पान फूल
मनी मंतरली सृष्टी

देह संसार टुकीचा
मन पसारा अमाप
देह कपाटाचे दार
मन चोरखण आत.

देह जाचतो टाचतो
मन मखमल मऊ
देह वचक दरारा
मन म्हणे नको भिऊ

देह जड जड भिंत
मन झिरपती ओल
देह रंग सजावट
मन गहराई खोल.

देह मन देह मन
जरी तळ्यात मळ्यात
देहा मनाचे अद्वैत
भरी घडा काठोकाठ

Tuesday, 6 October 2015

डॉ.नरेन्द्र दाभोळकरांची कविता

डॉ.नरेन्द्र दाभोळकर सरांची एक निर्भीड कविता ....

मुर्त्यांना पुजण्यापेक्षा, माणूसकिला पूजतो मी !
काल्पनिक देवांना न मानता, फुले,शाहू,आंबेडकरांना वाचतो मी !
छाती ठोकून सांगतोय, असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी !
पोथ्या,पुराणे वाचण्यापेक्षा शिवरायांना वाचतो मी !
दगडासमोर त्या कशाला झुकू ? जिजाई,सावित्री,रमाईपुढे नतमस्तक होतो मी !
छाती ठोकून सांगतोय, असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी !
---------------------------------

---------------------------------
घामाचे पैसे दानपेटीत टाकून, भटांची घरे भरत नाही मी !
तहानलेल्यांना पाणी, भूकेलेल्यांना अन्न देऊन, त्यांच्यातच देव शोधतो मी !
छाती ठोकून सांगतोय, असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी !
हिंदू,मुस्लिम,सिख,ईसाई म्हणून जगण्यापेक्षा, माणूस म्हणून जगतो मी !
धर्मातील पाखंडांना न जपता, माणूसपणालाच जपतो मी !
छाती ठोकून सांगतोय, असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी !
कर्तुत्ववान माणसापेक्षा, दगडाला श्रेष्ठ समजत नाही मी !
मंत्र,होमहवन,कर्मकांड यांना पायाखाली तुडवून, मनगटावर भरवसा ठेवतो मी !
छाती ठोकून सांगतोय, असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी !
मांजर आडवी गेली म्हणून न थांबता, थेट माझ्या ध्येयाजवळ त्या पोहोचतो मी !
अंधश्रद्धेला मातीत लोळवून, विज्ञानवाद स्विकारतो मी !
छाती ठोकून सांगतोय, असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी !
-डॉ.नरेन्द्र दाभोळकर

Saturday, 18 July 2015

‘प्लेटलेट्स म्हणजे काय?’

हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे.
रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात.

या प्लेटलेट्स मुळातच एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात. त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे.
या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’ ही संज्ञा वापरली आहे.

रक्तामध्ये प्रामुख्याने तीन पेशी असतात. लालपेशी (आरबीसी), पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी) आणि प्लेटलेट्स (तंतुकणिका). त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ची संख्या सर्वाधिक असते. प्लेटलेट्स या मोठया हाडांतील
रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात. त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5-9 दिवसांचं असतं. जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात.

प्लेटलेट्सचं कार्य

रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वाचं असतं.
ऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातून होतं.
तसंच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशीस्तरांवर पोषण करते.
एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानीदेखील होऊ शकते.

अशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात.
त्यामुळेच प्लेटलेट्सना
‘मानवी शरीराची कवचकुंडलं’ म्हटलं जातं.

प्लेटलेट्सची संख्या

सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या दीड ते साडेचार लाख इतकी असते.

संख्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गुठळी होऊन,
रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात.
हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास,
शरीराचा तो भाग बधीर होऊन निकामी होऊ शकतो.

संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्त्राव अधिक होतो.
म्हणजे नाकातून, हिरडयांमधून, थुंकीतून रक्त पडतं.
त्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रज:स्रव अधिक प्रमाणात होतो.
जखम झाल्यास रक्तस्रव आटोक्यात येत नाही.
जास्त रक्त गेल्याने थकवा येतो.

प्लेटलेट्स कमी होण्याची कारणं

•    डेंग्यू, मलेरियाचा ताप
•    अनुवंशिक आजार
•    केमोथेरपी

संख्या कमी झाल्यास...

डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते.
त्यामुळे 2-3 दिवसांचा ताप आल्यास,
त्या त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित रक्ततपासणी (सीबीसी टेस्ट) करून घ्यावी. त्यानुसारच उपाययोजना करावी.

प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास लक्षात ठेवायच्या गोष्टी :

•    लसूण खाऊ नये.
•    अधिक श्रमाचे व्यायाम तसंच दगदग करु नये.
•    अ‍ॅस्प्रिन, कोल्डडॅगसारखी औषधे घेऊ नयेत.
•    दात घासताना ब्रश लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.
•    सु-या, कातरी वापरताना काळजीने वापरावे.
•    बद्धकोष्ठता होणार नाही, याची काळजी घ्यावी.
•    त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

प्लेटलेट्स कमी झाल्यास,
त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत.
प्लेटलेट्ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत.
पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं.
                                      
 नैसर्गिकरीत्या ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यात मदत करतील हे 7 पदार्थ .

जर तुम्ही शरीरात कमी होत चाललेल्या प्लेटलेट्समुळे चिंताग्रस्त असाल तर घाबरू नका कारण तुम्ही तुमचा आहारात काही पदार्थांचा समावेश करून ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवू शकता.

शरीरात प्‍लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला थ्रोम्बोसायटोपेनिया नावाने ओळखले जाते. या निरोगी व्यक्तीच्या शरीरात सामान्य प्लेटलेट काउंट 150 हजार ते 450 हजार प्रती मायक्रोलीटर असतो. परंतु जेव्हा हा काउंट 150 हजार प्रती मायक्रोलीटरपेक्षा खाली येतो तेव्हा याला लो प्लेटलेट मानले जाते. काही विशिष्ठ प्रकरच्या औषधी, अनुवांशिक रोग, कँसर, केमोथेरपी ट्रीटमेंट, अल्कोहलचे जास्त सेवन आणि काही विशिष्ठ प्रकारचे आजार उदा. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्या झाल्यानंतर ब्लड प्लेटलेट्सची संख्या कमी होते.
---------------------------------

---------------------------------

पुढे जाणून घ्या, नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढण्व्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा....

१.पपई -

पपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते. 2009 मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की, डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते. पपईचे पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता. याची चव ग्रीन टी प्रमाणे असते.

२.गुळवेल

गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कर्वे तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध होते.

३.आवळा

प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन 'सी' प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुम्ही प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी 3-4 आवळे खावेत. दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता.

४.भोपळा

भोपळा कमी प्लेटलेट कांउटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आ
हे. भोपळा व्हिटॅमिन 'ए' ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते.

५.पालक

पालक व्हिटॅमिन 'के'चा चांगला स्रोत असून अनेकवेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन 'के' योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्‍लॉटिंगसाठी आवश्यक आहे. अशाप्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडींगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. दोन कप पाण्यामध्ये 4  ते 5 पालकाची ताजी पानं थोडावेळ उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरुपात करू शकता.

६.नारळ पाणी

शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे.

७.बीट

बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे. नैसर्गिक अँटीऑक्‍सीडेंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे, बीट प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते. दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्‍सीडेंट गुणामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.